श्री निपटनिरंजन

हे एक संतकवी असून यांचा जन्म बुंदेलखंडातील चंदेरी गावी चिझौतिया जातीच्या गौड ब्राह्मण कुळात झाला. लहानपणापासून यांच्या मनावर धार्मिक संस्कार होते. संत दादू दयालची भजने हे आवडीने गात. सन १६६३च्या सुमारास आपल्या वृद्ध मातेला घेऊन हे बऱ्हाणपूरमार्गे औरंगाबादेस आले आणि तेथेच राहू लागले. औरंगपुऱ्यात एकनाथमंदिराजवळ चिलखते वगैरे बनविण्याचा यांचा छोटा व्यवसाय होता. परंतु धंद्यात अपयश आल्याने ते निराश झाले. वृद्ध आई मृत्यू पावली तेव्हा गरिबीमुळे त्यांना तिचा अंत्यसंस्कारही नीटसा करता आला नाही. आईच्याच चितेवरची राख अंगाला फासून हे पूर्ण बैरागी बनले.

ध्यानधारणा व योगसाधना यांत त्यांचा काळ जाऊ लागला. काही दिवसांनी मठाच्या बागेतच यांना दत्तदर्शन झाले. कोणा चर्पटनाथ नामक साधुपुरुषाकडून यांनी देवगिरीवर गुरुपदेश घेतला. अष्टमहासिद्धी त्यांना प्राप्त झाल्या. प्रत्यक्ष औरंगजेबावरही या योगी पुरुषाच्या सामर्थ्याचा प्रभाव पडला.

त्यांची काही पदे व दोहे प्रसिद्ध आहेत. 

महाराष्ट्राच्या संत परंपरेत तसेच सूफी परंपरेत निपट बाबा परिचित होते व त्यांच्या इतर संतांशी गाठी भेटी होत असत. संत कवी महिपतीनी पण आपल्या भक्त लीलामृत मध्ये निपट निरंजनांचे वर्णन केले आहे. असा पण एक प्रवाद आहे की निपट व निरंजन ही गुरु शिष्याची जोडी होती व त्यांचे नाव बरोबर घेतले जाते.

निपट निरंजनाचें लिखाण हे नाथ परंपरेला शोभेल असेच  होते व जास्त करून ते हिंदीतच रचना करत. ह्यांचे किती ग्रंथ उपलब्ध आहेत ह्याबद्दल माहिती नाही.

निपट निरंजन ह्यांचे मंदिर औरंगाबाद येथे आहे 

Similar Posts