Marathwada Tourism Development Chamber (MTDC)

मराठवाडा टुरिझम डेव्हलपमेंट चेंबर साठी भारतभरातून २५ संस्थांनी सदस्यत्व घेतले आहे.  मराठवाडा टुरिझम डेव्हलपमेंट चेंबर कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अन्वये आरओसी-मुंबईकडे नोंदणीकृत आहे. नोंदणी क्रमांक ३९२९९६. ही भारतातील विविध पर्यटन कंपन्यांच्या सुधारणेसाठी स्थापन केलेली संघटना आहे. यात भारत सरकार च्या सोबतीने पर्यटन विकासासाठी कार्य करत आहे. हि संस्था विविध संस्कृती, समुदाय, तसेच पर्यटन सुविधांचा विकास आणि संवर्धन करेल, पारंपारिक संस्कृती आणि ओळखीबद्दल अभिमानाची भावना नागरिकांमध्ये विकसित करेल आणि पर्यटकांच्या आवडीची ठिकाणे सुव्यवस्थापित करण्यास मदत करेल.

पर्यटन हा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे, आपल्या दैनंदिन व्यस्त कामांमधून वेळात वेळ काढून फिरायला जायला प्रत्येक व्यक्तीला आवडते. पर्यटनामुळे माणूस समृद्ध होतो म्हणतात ते उगीच नाही. आपल्या सभोवतालचे हे सुंदर विश्व पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. पर्यटनाचे विविध प्रकार आहेत यामध्ये धार्मिक पर्यटन, कुटुंबियांसोबत पर्यटन, मित्र मैत्रिणीसोबत केलेली भटकंती, साहसी पर्यटन असे विविध प्रकार आहेत.

देश विदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी आपल्या महाराष्ट्रात देखील विविध पर्यटन स्थळांचा विकास होत आहे. प्रामुख्याने कोकण, पुणे विभागाकडे पर्यटकांचा ओढा जास्त आढळून येत आहे. मराठवाड्यातील पर्यटनाचा प्रामुख्याने विचार करण्याची गरज आता भासत आहे.

याआधी बहुतांश भारतीय पर्यटक परदेश सहलींना पसंती देत, पण आता परिस्थिती बदललेली आहे, आता भारतीय पर्यटकही आपल्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन करू लागले आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याकडील पर्यटनस्थळांची योग्य निगा राखली गेली पाहिजे, तसेच स्थानिक पर्यटनस्थळांची जागतिक पातळीवर विविध मार्गांनी जाहिरात करून विदेशी पर्यटक आपल्याकडे पर्यटनासाठी उत्सुक होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रशासनाला मिळणाऱ्या उत्पन्नात पर्यटन व्यवसायातून मिळणा-या पैशांचा वाटा मोठा आहे. मराठवाडा व औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे. जगभरातील पर्यटन ठिकाणे जर विचारात घेतली तरीही आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात हि सर्व ठिकाणे पाहू शकणार नाही, त्यामुळे पर्यटक अगदी निवडक पर्यटन ठिकाणांची भ्रमंती करण्यास अग्रेसर असतात आणि त्याप्रमाणेच आपल्या  सहलीचे बेत आखतात. आपण आपल्या देशात पर्यटनासाठी जातो तेव्हा आपल्या देशातील पैसे आपल्याच देशात राहतो उलट ज्यावेळी आपण विदेशात पर्यटनासाठी जातो तेव्हा त्या देशातील परकीय चलनात आपल्या पर्यटनामुळे वाढ होते. त्यामुळे आपणही आपल्या देशात विदेशी पर्यटक जास्त प्रमाणात येऊन विदेशी चलन कसे वाढवले जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे. भारतातील पर्यटक मराठवाड्यातील विविध पर्यटन स्थळांच्या शोधात आहेत या संधीचा फायदा घेतला पाहिजे. आपल्या भारत देशाची ओळख आता एक आर्थिक महाशक्ती म्हणून होत आहे, त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनेही भारताचा संपूर्ण जगात वरचा क्रम आहे. ह्या आधुनिक नव्या युगात नाविन्यपूर्ण पर्यटन स्थळांची निर्मिती करण्याची अत्यंत गरज आहे, प्रशाषण त्यासाठी नक्की प्रयत्न करेल अशी आशा आपण बाळगूया.
मराठवाड्यात पर्यटन क्षेत्रात वेगाने प्रगती साधायची असल्याने प्रामुख्याने पायाभूत सुविधा विकसित करायला हव्यात. यामध्ये रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग, हवाई मार्ग आणि जल मार्ग या चारही महत्वाच्या मार्गांनी देशातील महत्वाच्या शहरांसोबत मोठ्या प्रमाणात, उत्तम प्रकारे कनेक्टिविटी उपलब्ध करून देणे यास प्राधान्य द्यावे. याद्वारे विविध भागातून पर्यटकांचा ओघ मराठवाड्याकडे वळेल तसेच मराठवाड्यातील पर्यटक आणि इतर वर्गातील लोक इतर भागात पर्यटनासाठी विनासायास जाऊ शकतील.

पर्यटकांसाठी मार्गदर्शक स्टॉल – बस, रेल्वे, विमान स्थानकांजवळ पर्यटकांसाठी स्थानिक पर्यटनाविषयी विस्तृत माहिती देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्यास निश्चित एक चांगला बदल जाणवेल. उत्तम प्रकारची अंतर्गत प्रवास व्यवस्था पर्यटकांना उपलब्ध करून देणे तसेच सर्व पर्यटन स्थळी ठिकठिकाणी संपूर्ण सुविधायुक्त रिफ्रेशमेंट सेन्टर्स ची व्यवस्था असायला हवी.
इतर देशांतील पर्यटनस्थळ विकासाप्रमाणे स्वच्छता, सुरक्षा, हॉटेल, मूलभूत सुविधांची गरज आहे. मराठवाड्याचा विचार करता, गडकिल्ल्यांचा परिसर विकसित केल्यास देशातंर्गत आणि परदेशी पर्यटक संख्या वाढू शकेल.

२७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्या तुलनेत २५ जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा होताना दिसत नाही प्रशासनाने याकडे लक्ष देऊन विविध ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करणे गरजेचे आहे.
अजंता वेरूळ सारख्या जागतिक वारसा म्हणून घोषित झालेल्या ह्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रदेश आता पुन्हा नव्याने संपन्न करण्याची गरज आहे. सर्व वयोगटातील पर्यटकांना आकर्षित करतील, अशी पर्यटनस्थळे मराठवाड्यात असल्याने भारतीयांसह जगभरातील पर्यटकांची संख्या मराठवाड्यात वाढली पाहिजे. मराठवाड्यामध्ये अनेक आश्चर्ये दडलेली आहेत. ज्याबद्दल पर्यटक अनभिज्ञ आहेत.

वन्य प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्यासाठी मराठवाड्यातील अभयारण्य विकसित करण्याची गरज आहे. यात औरंगाबाद जवळील गौताळा, उस्मानाबाद जवळील येडशी, जायकवाडी येथील पक्षी अभयारण्य यांचा समावेश होतो.