श्री दाक्षायणी देवी मंदिर 

औरंगाबादच्या लासूर गावात शिवना नदीच्या काठावर दाक्षायणी देवीचं भव्य मंदिर वसलेलं आहे. ही देवी लासुर गावचं आराध्य दैवत आणि वैजापुर तालुक्याचं ग्रामदैवत आहे. प्रसन्न मूर्ती, आकर्षित करणारी विद्यूत रोषणाई, डोक्यावर चांदीचा टोप आणि अंगभर दागिन्यांनी नटलेली ही देवी दाक्षायणी दक्ष राजाची कन्या आहे. देशात ही एकमेव देवी आहे जिचं पीठ या गावाखेरीज कुठेही नाही. त्यामुळे देशभरातले भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.


दाक्षायणी देवीची आख्यायिका
या देवीच्या लासुर गावात प्रकट होण्याची आख्यायिका आहे. दाक्षायणी देवीचा आई-वडिलांकडून अपमान झाल्यावर तिनं पुत्रकामेष्टी यज्ञात उडी घेतली. त्यानंतर शंकरानं जटा आपटून तांडव केलं आणि देवी पुन्हा लासुर गावी प्रकटली.
गावातील देवीच्या मंदिराचं बांधकाम पूर्वी हेमाडपंथी होतं. मात्र काळ बदलला आणि मंदिराचं रुपही बदललं. देवीच्या मंदिरासमोर एक दिपमाळ आहे. त्यावर कोरलेल्या वाघाच्या मूर्ती आपलं लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या मध्यभागी छतावर कोरलेलं सुदंर कमळ, मंदिरावरील नक्षीकाम देखणं आणि सुंदर आहे. त्यामुळं एक वेगळीच प्रसन्नता याठिकाणी अनुभवायला मिळते. एक मुख्य कळस आणि तीन उपकळस असलेलं हे मंदिर गावाच्या प्रत्येक कोपऱ्यातून नजरेस पडतंच पडतं.
मंदिराच्या रस्त्यावर देवीला अर्पण करण्यासाठी साडी, फुलांच्या माळा आणि इतर साहित्यांची दुकानं आपल लक्ष वेधून घेतात. 30 वर्षांपूर्वी या मंदिराची देखभाल तहसील कार्यालयाकडे होती. आता गावचं मंदिराची देखभाल करतो. देवीच्या मंदिरासमोर भला मोठा सभामंडप आहे.
लोकांच्या नवसाला पावणारी देवी अशी या देवीची भक्तांमध्ये ओळख आहे. देवीनं पुत्रकामेष्टी यज्ञात उडी घेतल्याची आख्यायिका असल्यानं हा यज्ञ कायम तेवत असतो. या यज्ञाचा अंगारा कपाळावर लावला की आपण देवीला घातलेलं साकडं पूर्ण होतं असं सांगितलं जातं. त्यामुळे भाविकांच्या गर्दीनं हे मंदिर नेहमी फुललेलं असतं.
या मंदिराच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या मूर्ती समोर वाघाची मूर्ती आहे. ही मूर्ती एका अंखड दगडी शिळेत कोरलेली आहे. बाजूला कासवाची मूर्तीही आहे. गर्दीच्या काळात भाविकांच्या दर्शनासाठी विशेष सोय करण्यात आली आहे.
वर्षातून दोन वेळा गावात मोठा उत्सव पार पडतो. एप्रिल-मे महिन्यात मोठी यात्रा आणि नवरात्रीत नऊ दिवस मंदिर भक्तांनी गजबजलेलं असतं. वैजापुर तालुक्यातल्या नववधूंसाठी दाक्षायणीचा आशिर्वाद ही लग्न समारंभातलीच एक प्रथा आहे. गावागावातल्या नववधू देवीचा आशिर्वाद घेऊन आपल्या सुखी संसाराला सुरवात करतात. हे ह्या ग्राम देवते च आगळेवेगळे रूप आहे.

लासूरगावी औरंगाबादहून रेल्वे, बस, खासगी वाहनाने जाता येते. औरंगाबादहून चाळीस किलोमीटर अंतरावर हे श्रीक्षेत्र आहे. यासाठी लासूर स्टेशन येथे यावे. तेथून तीन किलोमीटरवर मंदिर आहे. वैजापूर, गंगापूर येथून तीस किलोमीटर अंतर असून, वेरूळ, खुलताबाद ही धार्मिक, प्रेक्षणीय स्थळे तीस-पस्तीस किलोमीटर अंतरावर आहेत. संस्थानचे पदाधिकारी सुविधा पुरविण्यात पुढाकार घेत आहेत.

Similar Posts