श्री रेणुका माता मंदिर

प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजित यांची राजकन्या देवी रेणुका/ येल्लुआई/ येल्लम्मा ही पतितांची देवी म्हणून पूजली जाते. ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात. महाराष्ट्रात माहूरगडाव्यतिरिक्त दैत्यसंहारासाठी व भक्तकल्याणासाठी रेणुकामाता यमाई, एकविरा, मोहटा,पद्माक्षी रेणुका अशा नानाविविध अवतारांत प्रकट झाली. भक्त तिला “साऱ्या जगाची आई” अर्थात “जगदंबा” मानतात.

यल्लम्मा देवी हे कालीचेच रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक हात अहंपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तिथे ती महाकाली, जोगम्मा, सोमालम्मा, गुंड्डम्मा, पोचम्मा, मायसम्मा, जगदम्बिका, होलियम्मा, रेणुकामाता, येल्लम्मा, मरिअम्मा आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते. खाली चित्रात दाखविलेले मंदिर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर या आदिवासीबहुल भागातील गावाजवळील माहूरगडावर आहे.

रेणुका ही प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजित नावाच्या राजाची राजकन्या, आणि जमदग्नी ऋषीची पत्‍नी होती. या जोडप्याला पाच मुलगे होते, त्यांतला एक परशुराम होता.

रेणुका देवी मंदिर डोंगराच्या माथ्यावर स्थित आहे आणि त्याभोवती गुहा आहेत. मंदिरात जाण्यासाठी जवळपास 200-250 पायऱ्या चढून जावे लागते. या परिसरात भगवान परशुराम आणि भगवान दत्तात्रेय यांची मंदिरे आहेत. रेणुकादेवीला सोन्याच्या फुलांचे झुमके, सोन्याच्या माळा, नाकातील अंगठी अशा विविध सोन्याच्या दागिन्यांनी सजवले जाते.

माहूर हे अतिशय धार्मिक स्थळ असून त्याच्या आजूबाजूला अनेक मंदिरे आहेत. हे ठिकाण सागवान वृक्ष आणि वन्य जीवनाने समृद्ध जंगलांनी वेढलेले आहे. माहूर हा बेरार इतिहासातील एक महत्त्वाचा किल्ला होता.

पुजारी मूर्तीची विविध पूजा करतात. रेणुका देवी मंदिरात भाविकांना स्वतःहून आरती करण्याची परवानगी आहे.

  • मंदिराच्या वेळा: सकाळी 6.00 ते रात्री 10.00 पर्यंत.
  • मंदिरात जाण्यासाठी सुमारे 200-250 पायर्‍या आहेत. ज्यांना चढता येत नाही त्यांच्यासाठी डोल्या उपलब्ध आहेत.

प्रसिद्ध उत्सव

  • जानेवारी – मकर संक्रांत
  • ऑक्टोबर – नवरात्री, विजयादशमी
  • नोव्हेंबर – दिवाळी
  • डिसेंबर – दत्तात्रेय जयंती (डिसेंबर/जाने)

Similar Posts