औसा किल्ला

औसा किल्ला हा औसा शहराच्या दक्षिणेस ५.५२ हेक्टर क्षेत्रात उभा असलेला भुईकोट किल्ला आहे. बहामनी राजवटीत इ.स.१४६६ मध्ये महमूद गवान याची बहामनीचा मुख्य वजिर म्हणुन नियुक्ती झाली. आपल्या वजिरीच्या काळातच त्याने औसा किल्ला बांधला. खोलगट भागात असलेल्या या किल्याचा मुख्य भाग लपलेला दिसतो. अगदी जवळ गेल्याशिवाय हा किल्ला दिसत नाही. किल्यातील काही वास्तु व तटबंदीच्या काही भागावर तुर्क व युरोपियन स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसतो.

औसा शहराला ऐतिहासिक, धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. औसा या शहराचे हिजरी १०१४ मध्ये मलीक अंबरच्या काळामध्ये अमरापूर असे नाव होते. औसा नगराची प्राचीन नोंद बदामीचा चालुक्य राजा विजयादित्य याच्या काळातील ताम्रपटात उच्छीव त्वरीशत असे आहे. उच्छीव त्वरीशत हा शब्द संस्कृत शब्द असून त्याचा श्रेष्ठ अथवा प्रमुख असा अर्थ होतो. जिनसेन या आठव्या शतकातील जैन लेखकाने “औच्छ” असा उल्लेख केलेला आहे. सुप्रसिद्ध कवी जैनमुखी कनकामर हा औसाचा रहिवासी होता. त्याने “करकंड चरयू” हा काव्यग्रंथ लिहिला आहे. या कव्याग्रंथात त्याने औसा या नगराची “असई” असा उल्लेख केला आहे. प्राचीन काळापासून उच्छीव, औच्छ, असई, औसा अशी नवे रूढ झाली असावीत. यादव कालीन खोलेश्वराच्या काळातील अंबाजोगाई शिलालेख (शके ११५०) यात उदगीर बरोबर औसाचीही नोंद आहे. यादव काळात औसा हे प्रशासकीय विभागाचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होते.

औसाचा भुईकोट किल्ला

औसा येथे भुईकोट किल्ला असून, त्याचे क्षेत्रफळ २४ एकर ३० गुंठे आहे. किल्ल्याभोवती खंदक असून, ते सध्याही चांगल्या स्थितीत आहे. खंदकात अनेक विहिरी आहेत. खंदकाला लागून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी पहिला मोठा दरवाजा लागतो त्यास “लोह्बंदी” दरवाजा म्हणतात. दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर प्रत्येक्ष किल्ल्याच्या पहिल्या तटास “अह्शमा” नावाचा दरवाजा आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी हा एकमेव दरवाजा आहे. लोह्बंदी दरवाजा हे पूर्वाभिमुख आहे. किल्ल्यात एकूण दोन तट आहेत. आत राणीमहाल, लालमहाल, पाणीमहाल इत्यादी अनेक इमारती आहेत. किल्ल्यात परिबावडी, कटोराबावडी व चांद बावडी या तीन महत्त्वाच्या विहिरी आहेत. बिदरच्या बहमनी राज्याच्या मुख्य वजीर महंमद गवान यांच्याकाळात औसा किल्ला बांधण्यात आला.

किल्ल्याचे राजकीय महत्त्व
शहरातील किल्ल्याला ऐतेहासिक काळात राजकीय महत्त्व होते. हा शहराला यादवपूर्ण काळापासून महत्त्व होते. इ.स. १३५७ मध्ये बहामनी सुलतानने येथे आपली सत्ता स्थापन केली. या किल्ल्यावर पुढे पहिला बुऱ्हाण निजामशहा याने ताबा मिळविला होता. निजामशाही विरुद्ध आदिलशाही आणि मोगल यांच्यात इ.स. १६३५ मध्ये झालेल्या तहाच्या फर्मानात औश्याची नोंद आहे. मोगल बादशहा शाहजहान याच्या खास आदेशाप्रमाणे हा किल्ला जिंकून घेतला होता. मराठ्याच्या स्वातंत्र्य युद्धात धनाजी जाधव आणि मोगल सेनापती झुल्फिकार खान यांच्यात या भागात अनेक चकमकी झाल्या होत्या. हैद्राबादच्या निजामी संस्थानकडून १८५२ मध्ये इंग्रजांनी हा भाग गहाण म्हणून घेतला होता. त्यांचा ताबा ह्या भागावर १८५७-५८ पर्यंत होता. त्यावेळी कर्नल मेडीज टेलर हा ब्रिटीश कमिशनर म्हणून नळदुर्ग जिल्ह्याचा प्रमुख होता. इथली मठपरंपराही जुनी आहे. औसेकर महाराज, पडद्याप्पा मठ, कौकाडी बाबांचा मठ, गोसायाचा मठ, नंगेबाबांची समाधी, अशा अनेक ऐतिहासिक वास्तुंनी संपन्न असे शहर आहे.

औसा भुईकोट किल्ला लातूरपासून २० किलोमीटरवर लातूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१वर आहे. तेथे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था हाेऊ शकते.

Similar Posts